अकोला | प्रतिनिधी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षक हॅकेथॉन स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोला येथील उपक्रमशील शिक्षक शशिकांत बांगर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक संकल्पनेला विदर्भ विभागातून प्रथम क्रमांक, तर महाराष्ट्र राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
ही हॅकेथॉन स्पर्धा शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. शिक्षण संस्थांना अधिक प्रभावी बनवणे, शैक्षणिक व सामाजिक आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे, तसेच आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल साधनांचा शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रियेत प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. ही स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे पार पडली.
अकोला एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोला येथील शिक्षक शशिकांत बांगर यांनी “विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शैक्षणिक प्लॅटफॉर्म – डिजिटल क्विझ बुक अप” ही नाविन्यपूर्ण डिजिटल प्रतिकृती सादर केली. शिक्षण व कौशल्य विकास या विषयांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या अ
प ने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून नियमितपणे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना NMMS, INSPIRE मानक योजना यांसह विविध स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी अधिक सुलभ, परिणामकारक व तंत्रज्ञानाधिष्ठित पद्धतीने करता येत आहे.
या अॅपच्या प्रभावी वापरामुळे अनेक विद्यार्थ्यांनी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून प्रत्येकी ४८ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीस पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे, न्यू इंग्लिश हायस्कूलसह महाराष्ट्रातील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी या अॅपच्या माध्यमातून विविध स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. त्यामुळे हे अॅप राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी विश्वासार्ह व प्रेरणादायी शैक्षणिक साधन ठरत आहे.
या यशाबद्दल अकोला एज्युकेशन सोसायटी, अकोला चे अध्यक्ष श्री. राजेश्वर देशपांडे, कार्याध्यक्ष श्री. विलासराव देशपांडे, सचिव श्री. शार्दुल दिगंबर तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शशिकांत बांगर यांचे अभिनंदन केले आहे.
या यशामागे शाळेच्या प्रशासन व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना शशिकांत बांगर यांनी व्यक्त केली. शाळेचे प्राचार्य श्री. माधव मुनशी यांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परवानगी देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. उपप्राचार्य श्री. उदय हातवळणे, पर्यवेक्षिका कु. अलका मुंढे, पर्यवेक्षक श्री. हेमंत ओझरकर व श्री. अमोल बुटे तसेच सर्व सहकारी शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
या यशाच्या निमित्ताने भविष्यातही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस शशिकांत बांगर यांनी व्यक्त केला आहे.
