45 लिटर टाकी असलेल्या नव्या वाहनात 48 लिटर पेट्रोल भरल्याची तक्रार; बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रारदारावर गैरवर्तनाचा आरोप

45 लिटर टाकी असलेल्या नव्या वाहनात 48 लिटर पेट्रोल भरल्याची तक्रार; बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रारदारावर गैरवर्तनाचा आरोप

बाळापूर | प्रतिनिधी

बाळापूर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर गंभीर प्रकार घडल्याचा आरोप समोर आला असून, 45 लिटर क्षमतेची टाकी असलेल्या नव्या वाहनात तब्बल 48 लिटर पेट्रोल भरल्याचा प्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बयान देण्यासाठी बोलावलेल्या तक्रारदारांवरच पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदार विजय श्रीकृष्णाजी मालोकार हे आपल्या भाऊ अजय श्रीकृष्णाजी मालोकार व चालक राजकुमार मालोकार यांच्यासह बाळापूर पोलीस ठाणे येथे हजर झाले होते. विजय मालोकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पेट्रोल पंपावर 45 लिटर टाकी असलेल्या नव्या वाहनात 48 लिटर पेट्रोल भरल्याची पावती देण्यात आली, ही बाब तांत्रिकदृष्ट्या अशक्य असून फसवणूक असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी लेखी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनुसार पोलीस उपनिरीक्षक शेंदाने  यांनी तक्रारदारांना बयान नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले. बयान सुरू असताना पीएसआय शेंदाने यांनी “तुम्ही गाडीची टाकी बदलली आहे का?” असा प्रश्न विचारला. त्यावर अजय मालोकार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले, याच कारणावरून पीएसआय शेंदाने , एका पोलीस कॉन्स्टेबल व पीएसआय हिवाळे यांनी अजय मालोकार यांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी तक्रारदार विजय मालोकार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की व अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तसेच विजय मालोकार मोबाईलद्वारे घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण करत असताना ते थांबवण्यात आले व “व्हिडीओ काढल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल” अशी धमकी देण्यात आली, असा आरोपही तक्रारीत नमूद आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे पेट्रोल पंपातील कथित फसवणूक आणि त्यानंतर पोलिसांकडून तक्रारदारांशी झालेल्या वागणुकीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

अन्य खबरे

न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोलाचे शिक्षक शशिकांत बांगर यांना विदर्भात प्रथम, राज्यात द्वितीय क्रमांकाचा मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

राशिफल

आज का मौसम

आज का मौसम

शेयर बाज़ार लाइव